Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचाही महाराष्ट्रभर दौरा असणारा आहे. अशातच केंद्राकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. मात्र आता शरद पवार यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारल्याचे समोर आले आहे. पवार यांनी सीआरपीएफ अधिकाऱ्यांना परत पाठवल्याचे सांगण्यात येत आहे
शरद पवार यांची दिल्लीत बैठक
या संबंधित पवार यांनी शुक्रवारी सुरक्षा यंत्रणा – सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत दिल्ली अग्निशमन सेवा, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी दिल्ली नगर परिषद आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. मात्र सुरक्षा घेण्याच्या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही.
शरद पवार यांना 21 ऑगस्ट रोजी केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिली. पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या 55 सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी नियुक्त करण्यात आली होती. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले होते, मात्र शरद पवारांनी आता झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे.
माहिती मिळवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा – शरद पवार
केंद्राकडून सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी २३ ऑगस्ट रोजी शंका व्यक्त केली. यावर ते म्हणाले, “गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितले की सरकारने तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी त्यापैकी एक आहे.
मात्र, मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. म्हणून त्यांना माझ्यावर पाळत ठेवायची आहे, योग्य आणि अचूक माहिती मिळवायची असेल. नक्की काय हे सांगू शकत नाही. असं शरद पवार म्हणाले होते.