देशभरात आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत. अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होत आहेत यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळात हल्लाबोल करण्यात येत आहे.
निवडणुकांमध्ये विजय मिळावा म्हणून अनेक नेते जोरदार तयारीला लागले आहेत. अजित पवार गटाकडून देखील आगामी निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान खेचले आहेत.ही निवडणूक अतिशय गंभीरपणे घ्या, हलगर्जीपणा करू नका अशा सूचना अजित पवारांकडून देण्यात आल्या आहेत.
युवा अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की, कोणतेही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे किंवा माझ्याशी आधी बोला आणि मगच घोषणा करा तसेच आता आपण डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
लोकसभेचं नॅरेटिव्ह आपल्याला बदलायचे आहे. आपण शिव, शाहू आणि आंबेडकर विचारधारेने पुढे जाणार आहे. तसेच आपल्याला महायुती सोबतच पुढे जायचे आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून असणार आहे असे देखील अजित पवारांनी यावेळी बोलताना केले आहे.
याचसोबत कोणत्याही गोष्टीचा नकारात्मक प्रचार होता कामा नये. सोशल मीडियावर प्रचार वाढवा अशा सूचना देखील अजित पवारांनी दिल्या आहेत. जो पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने करेल त्याला जिल्हा पातळीवर सन्मान दिला जाईल. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला पुढे जाऊन मोठ्या पदावर देखील नेले जाईल तसेच सोशल मीडियावर आपला प्रचार अतिशय कमी असून अजिंक्य घड्याळ कार्यक्रम याचा चांगला प्रचार करा. असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
दरम्यान लाडकी बहिणी योजनेवरून सर्वांनी जोरदार टीका केली होती. अनेकांनी टिंगल देखील केली होती परंतु बहिणींनो तुम्ही काळजी करु नका आपण सगळी अर्थिक व्यवस्था चोख केली आहे असे देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.