सध्या देशभरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत.
भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी आता एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीत फूट पडणार की काय? अशी चर्चा रंगत आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवारांबरोबर झालेली युती म्हणजे ‘असंगाशी संग’ आहे असे भाष्य केले आहे., शिवसेनेच्या तानाजी सावंतांनंतर आता भाजपकडून खळबळजनक विधान समोर आल्यामुळे महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याची चर्चा चालू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडले नाहीत यामुळे भाजपच्या खासदाराचा पराभव झाला. त्यामुळेच अजित पवार गटासोबत झालेली युती असंगाशी संग आहे असे भाष्य गणेश हाके यांनी केले आहे. भाजपच्या खासदाराला पाडल्याचा आरोप हाकेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर केला आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे लाडकी बहीण कार्यक्रमानिमित्त नागपूरमध्ये आहेत. गणेश हाके यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले आहेत की, माझे बोलणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेले आहे जर तुम्ही अशी टीका करत बसलात तर कार्यकर्ते सुद्धा प्रतिक्रिया देत राहतील.
याचसोबत, हाकेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. माझं काम मी चालू ठेवले आहे असे अजित पवारांकडून सांगण्यात आले आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. हाके यांचे हे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट पाहिजेत आणि ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान,अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करु नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गणेश हाकेंना केले आहे.