अदियाला तुरुंगात (रावळपिंडी सेंट्रल जेल) बंद असलेले माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते इम्रान खान यांना दिल्या जाणाऱ्या गैरवागणुकीच्या प्रश्नावरून शुक्रवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये मोठा गदारोळ झाला. डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर नॅशनल असेंब्लीमध्ये बराच काळ गोंधळ उडालेला दिसून आला.
यादरम्यान नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल आणि हनिफ अब्बासी यांनी आपल्या तीव्र भाषणांमध्ये इम्रान खान यांच्या कार्यकाळात विरोधकांवर दडपशाहीचा आरोप केला. त्यावर विरोधी सदस्यांनी जोरदार निषेध नोंदवला आणि जोरदार घोषणाबाजी केली. अब्बासी यांच्या भाषणादरम्यान दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृहाच्या कॉरिडॉरमध्ये एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. हे पाहून सभापती अयाज सादिक यांनी सभा सोमवारी सायंकाळपर्यंत तहकूब केली.
विरोधी पक्षनेते उमर अयुब खान यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात पीटीआयचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्यासोबत होत असलेल्या कथित गैरवर्तनाचा निषेध केला. खान यांना त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाच्या नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. परदेशात राहणाऱ्या त्यांच्या मुलांशी फोनवरही बोलू दिले जात नाही. तुरुंग अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी पक्षाच्या खासदारांचा अपमान करतात. पीटीआयच्या खासदारांना त्यांच्या तुरुंगात असलेल्या नेत्याला भेटू दिले जात नाही असे सांगितले.
विरोधी पक्षनेत्याने आपल्या भाषणात इम्रानला तुरुंगात असलेल्या सुविधा बंद करण्याचा सरकारचा निर्णय, बलुचिस्तानमधील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, पीटीआय नेते आणि कामगारांचा कथित राजकीय छळ आणि युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांचा निषेध असा मुद्दाही उपस्थित केला. त्याला उत्तर देताना नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी विरोधी पक्षनेते खान यांना मीडियासमोर गोंधळ घालण्याऐवजी न्यायालयात आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यास सांगितले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह जवळपास सर्वच वरिष्ठ पीएमएल-एन नेते तुरुंगात राहिले आणि त्यानंतर त्यांनी न्यायालयांसमोर आपले निर्दोषत्व सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.
अहसान इक्बाल यांच्या उत्तरावर विरोधी पक्षनेते आणि अनेक सदस्य उभे राहिले आणि मंत्र्यांच्या दाव्याला उत्तर देण्यासाठी त्यांना बोलण्याची संधी देण्याची मागणी सभापतींना केली. पण स्पीकरने पीएमएल-एनचे एमएनए हनिफ अब्बासी यांना बोलण्याची संधी दिली.
हनीफ अब्बासी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात इम्रान खान यांच्यावर काही ‘वैयक्तिक’ टीका केली. पीटीआय सदस्यांच्या जोरदार विरोधामुळे त्यांना भाषण पूर्ण करता आले नाही. तुरुंगात डांबलेल्या नेत्याला कोकेन आणि हेरॉईनचा पुरवठा होत असल्याच्या अब्बासी यांच्या आरोपाला विरोधकांनी विरोध केला.