केरळच्या पलक्कडमध्ये आज, शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली . सरसंघचालक मोहन भागवत यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीचा शुभारंभ केला.या बैठकीला सर्व 32 संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील. या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांबरोबरच पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांतील महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बी.एल.संतोषही उपस्थित राहतील. एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर संघाची ही पहिलीच समन्वय बैठक आहे. या बैठकीत विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासंदर्भात आवश्यक उपाय योजनांवरही चर्चा केली जाईल.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहा सह-सरकार्यवाह आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यासह ३२ संघप्रणित संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्री आणि प्रमुख अधिकारी असे एकूण २३० कार्यकर्ते बैठकील उपस्थित असणार आहेत. तर संघाकडून ९० केंद्रीय अधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. केरळमध्ये संघाची समन्वय बैठक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे .