निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे.तिथल्या 90 जागांसाठी आता 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तसेच हरियाणा बरोबर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर करण्याची घोषणाही आयोगाने केली आहे.यापूर्वी दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार होते.
हरियाणातील सणामुळे मतदानाची तारीख बदलण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. भाजप आणि इंडियन नॅशनल लोक दलाने ही निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी केलेली होती.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार राजस्थानच्या अखिल भारतीय बिश्नोई महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आमच्याकडे तारीख बदलण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, अनेक पिढ्यांपासून पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील अनेक कुटुंबे गुरु जंभेश्वरांच्या स्मरणार्थ बिकानेर जिल्ह्यातील ‘असोज’ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी वडिलोपार्जित मुकाम गावात वार्षिक उत्सवात सहभागी होतात.यंदा हा सण 2 ऑक्टोबरला असणार आहे. यामुळे सिरसा, फतेहाबाद आणि हिस्सार येथील हजारो बिश्नोई कुटुंब मतदानाच्या दिवशी राजस्थानला रवाना होतील, त्यामुळे ते 1 ऑक्टोबरला मतदान करू शकणार नाहीत.
तसेच बिश्नोई समाजाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी, हिस्सार, सिरसा आणि फतेहाबाद जिल्ह्यात बिश्नोई बहुल गावे आहेत. सुमारे 11 विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हरियाणातील मतदानाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.