Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनीही आज मुंबईत माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस हे मास्टमाईंड असून, तेच महाराष्ट्र्राची समस्या असल्याचे म्हंटले आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “प्रत्येक गोष्टीमागे देवेंद्र फडणवीस हे सूत्रधार आहेत. तेच महाराष्ट्राची समस्या आहेत, संपूर्ण देश आणि पंतप्रधान मोदींना हे माहित आहे, त्यामुळेच त्यांना माफी मागावी लागली.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पुढे त्यांनी केवळ माफी मागून प्रकरण मिटणार आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला.
मालवण (Malvab) येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज रविवारी महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या सात महिन्यात कोसळला, मग आम्ही गप्प बसायचे का? शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ आम्ही आज आंदोलन करणार आहोत.”
महाविकास आघाडीच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया
यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज होत असलेले आंदोलन पूर्णपणे राजकीय आंदोलन आहे आणि त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. तुम्ही मला लाल किल्ल्यावरील पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे एकही भाषण दाखवा ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. पंडित नेहरूंनी तर त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती महाराजांचा अपमान केला आहे. यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी माफी मागणार का?
फडणवीस पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्यात आला, त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? कर्नाटकात त्यांच्या कार्याध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, यासाठी काँग्रेस माफी मागणार का? अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.