Mahavikas Aghadi Jode Maro Andolan : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जात आहे.
हे आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात केलं जात आहे. आज महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा सुरु आहे. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर ते गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत. आज गेट वे ऑफ इंडिया परिसरात हे आंदोलन करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान…त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत आहेत.
महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, मात्र आज रविवारचा दिवस आहे. तसेच या भागातील कार्यालयांना आणि शाळांना सुट्टी आहे तरी आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महविकास आघाडीने केला. त्यानंतर आता हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.