Mahavikas Aghadi Jode Maro Andolan : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जात आहे.
यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप त्यांनी लगावला. नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? जाणून घेऊया..
यावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण राज्यातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसत आहे. लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण दिल जाणार, संविधान बदलणार…हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये भीती पसरवून मते मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही.”
दरम्यान, महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, मात्र आज रविवारचा दिवस आहे. तसेच या भागातील कार्यालयांना आणि शाळांना सुट्टी आहे तरी आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महविकास आघाडीने उपस्थित केला. त्यानंतर आता हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मोर्चा आता हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढण्यात येत आहे.