Bangladesh : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर सातत्याने दबाव वाढत आहे. शेख हसीना सरकार पडल्यापासून, मोठ्या संख्येने हिंदू शिक्षकांना त्यांच्या सरकारी पदांचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. या शिक्षकांच्या कार्यालयात बाहेरील विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठा जमाव घोषणाबाजी करत त्यांच्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडत आहेत.
बांग्लादेशात आतापर्यंत ५० हिंदू शिक्षकांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. मात्र यामध्ये अजूनही जास्त संख्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
29 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आणि बाहेरील लोकांच्या जमावाने त्यांच्या एका कार्यालयात घुसून हिंदू शिक्षकांच्या राजीनाम्याची मागणी केली. तासन्तास धमकावल्यानंतर येथील शिक्षकांनी राजीनामा दिला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिक्षकांना घेराव घालून राजीनाम्याची मागणी
18 ऑगस्ट रोजी अजीमपूर सरकारी गर्ल्स स्कूल आणि कॉलेजच्या सुमारे 50 विद्यार्थिनींनी येथील हिंदू शिक्षकांना घेराव घातला आणि राजीनाम्याची मागणी केली. येथील एका शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांनी कधीही राजीनाम्याची मागणी केली नव्हती. अशाच घटना देशभरात घडल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये, विद्यार्थ्यांनी शिक्षकांना घेरलेले दिसत आहे आणि राजीनामा पत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जात आहे.
अशा परिस्थिती बांगलादेशातील हिंदू शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या प्रकरणावर बांगलादेशातील अंतरिम सरकार युनूस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच त्यांनी या प्रकरणाची अजूनही दखल घेतली नसल्याचा आरोप देखील येथील शिक्षकांनी केला आहे.