Eknath Shinde : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढण्यात.
गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात आज महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी त्यांनी ‘गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही’ अशा घोषणा दिल्या. यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया देत हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नव्हे तर राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अतिशय दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे. महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाहीत तर ते आमच्या अस्मितेचा विषय आहेत. मात्र, घडलेल्या घटनेचं राजकारण विरोधक करत आहे हे जास्त दुर्दैवी आहे.”
पुढे ते म्हणाले, “कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझरने शिवाजी महाराजांचा पुतळा दोन जेसीबी लावून तोडला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच जोड्याने मारणार आहे, अशा शब्दात शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला.
आजचे आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.