Telangana-Andhra Pradesh Rain Update : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला, अशा स्थितीत दोन्ही राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसात दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दोन्ही राज्यांतील अनेक भागात पुरामुळे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सलगाच्या पावसामुळे नद्या-नाले भरून वाहत आहेत, यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तसेच रेल्वे मार्ग देखील ठप्प झाले आहेत.
पंतप्रधानांची आंध्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून शक्य ते सर्व मदतीचे आश्वासन दिले. गृहमंत्री अमित शहा यांनीही परिस्थिती जाणून घेण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि केंद्र मदत देण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, एनडीआरएफच्या 26 पथके दोन्ही राज्यांमध्ये कालपासून मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत, तर आणखी 14 पथके पाठवण्यात येणार आहेत.
हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
तेलंगणा राज्यात आदिलाबाद, निजामाबाद, राजन्ना सिरसिल्ला, यादद्री भुवनगिरी, विकाराबाद, संगारेड्डी, कामारेड्डी आणि महबूबनगर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
आंध्र प्रदेशातही गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, विशेषत: विजयवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात. राज्यभरात 17,000 बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 14 जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत.
गुजरातमध्येही पावसाचा कहर
गुजरामध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे, गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे आतापर्यंत 30 जणांना जीव आपला गमवावा लागला आहे.
नुकतेच गुजरातमधील वडोदरा येथे मुसळधार पावसाच्या दरम्यान निवासी भागातून एकूण २४ मगरींची सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे विश्वामित्री नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पलीकडे वाढली असून तिचे पाणी शहरातील अनेक भागात शिरले आहे. वडोदरा रेंजचे वन अधिकारी करणसिंग राजपूत यांनी सांगितले की, नदीत एकूण 440 मगरी आहेत. या पुरामुळे अनेक मगरी निवासी भागात घुसल्या होत्या.