Narayan Rane : भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका देखील केली.
“उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे माहितीये, त्यांनी कधी कोणाच्या कानाखाली पण नाही मारली. काय धमकी देताय आणि गेट आऊट…असे काय धमकी देताय? तुम्ही मुख्यमंत्री असताना जनतेच तुम्हालाच गेट आऊट केलं, असं वक्तव्य करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
पुढे नारायण राणे म्हणाले, “पुढच्या निवडणुकीची वाट पाहताय, मुख्यमंत्री मलाच करा…सत्ता कशी येणार? आम्ही सत्ता द्यायला नाही बसलो, आम्ही सत्तेत आहोत आणि राहणार…तुमचं काय काम? काय केलं अडीच वर्षात? फक्त दोन दिवस मंत्रालयात…असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको. काहीच येत नाही अन् काय कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केली.
दरम्यान, सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर महाविकास आघाडीने काल मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑफ इंडिया असा इशारा दिला.
गेट वे ऑफ इंडिया आपल्या देशाचं प्रवेशद्वार आहे. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट. चालते व्हा, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला होता. यावरच नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत घेत ठाकरेंवर पलटवार केला आहे.