ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन अर्थात एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे.ही संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे.यामध्ये राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीचा समावेश आहे. तसेच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.
त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक विस्कळीत होणार आहे. तसेच ऐन उत्सवाच्या दिवसात प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे चित्र समोर आले आहे.लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
एसटी कामगारांच्या आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करा, या मागणीसाठी काल महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून राज्यभर निदर्शने करण्यात आली होती. मुंबई सेंट्रल येथे यावेळी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून सरकारला शेवटचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि तसेच नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट ५००० रुपये हजार मिळावेत अशामागण्यांचा समावेश आहे.
ह्या मागण्या खरे तर आधी राज्यसरकारकडून मान्य करण्यात आल्या होत्या मात्र सदर माागण्यांची पुर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून त्याची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग होत असल्याने आज सकाळी 6 वाजल्या पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरवात झाली आहे.