विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असतानाच आता अनेक नेते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चाणा उधाण येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळेच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करून घरवापसी करणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश अजूनही रखडलेला आहे. एकनाथ खडसे आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.मात्र आता खडसे यांच्या संभ्रमावस्थेतील भूमिकेवरून राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टिका होताना दिसत आहे.
एकनाथ खडसे यांचा राजीनामा राष्ट्रवादीने अद्याप स्वीकारलेला नाही यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करावे लागणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता. येत्या काही दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे.परंतु भाजपमधील अनेक नेत्यांचा देखील एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध आहे आणि यामुळेच त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश अजून रखडलेला आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आता एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “खडसेंचे कुटुंबच संभ्रमात टाकणारे आहे,आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. एकनाथ खडसे हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एकनाथ खडसेंनी ३० वर्षात विकासच केला नाही असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.तसेच ‘हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील एकनाथ खडसे यांचे चंद्रकांत पाटील हे विरोधक आहेत. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. आधी सुनेला लोकसभेत पोहोचवले , त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे खडसे राजकारण करत आहेत” अशा शब्दांत त्यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे.