Preethi Pal Creates History : भारतीय महिला धावपटू प्रीती पाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये T35 प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमधील प्रितीचे हे दुसरे पदक आहे. प्रितीने २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. प्रितीने ३०.०१ सेकंदाची वेळ नोंदवत आपली सर्वोत्तम कामगिरी केली.
यापूर्वी तिने 100 मीटर शर्यतीत 14.21 सेकंदाची वेळ घेत कांस्यपदक जिंकले होते. प्रितीसाठी हे यश खूप मोठे आहे. तिच्या चमकदार कामगिरीने तिने भारताचा झेंडा जगभर फडकवला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे प्रीती पाल?
प्रीती पाल ही उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी आहे. तिचे गाव कासेरू बक्सर मेरठमध्ये आहे. प्रीती एका सामान्य कुटुंबातून आली आहे. ॲथलेटिक्समध्ये करिअर करणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. तिचे वडिल अनिल कुमार दुधाची डेअरी चालवतात. प्रीतीचा संघर्ष एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. प्रीतीला बालपणीच सेरेब्रल पाल्सी झाल्याचे निदान झाले होते. सेरेब्रल पाल्सी हा एक आजार आहे ज्यामध्ये मेंदू आणि शरीराच्या स्नायूंचा योग्य संवाद होत नाही. यामुळेच या आजारातील व्यक्तीला कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी जास्त वेळ लागतो.
प्रीतीच्या वडिलांनी मेरठमध्येच तिच्यावर उपचार करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. मात्र, असे असूनही प्रितीने हार मानली नाही. प्रीती चांगल्या उपचारासाठी दिल्लीत आली होती. येथेच तिने जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये प्रशिक्षक गजेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. यानंतर प्रीतीने पॅरा स्पोर्ट्समध्ये स्वतःची छाप सोडण्यास सुरुवात केली आणि आता तिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला आहे.
प्रीती पालची कारकीर्द
प्रीती पालने यावर्षी मे महिन्यात झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. प्रितीने महिलांच्या १३५ आणि २०० मीटर प्रकारात चमकदार कामगिरी करून ही पदके जिंकली होती. एवढेच नाही तर प्रीती जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला पॅरा ॲथलीट बनली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी, प्रीतीने बेंगळुरू येथे इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्णपदके जिंकली होती.