Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच एक मोठी बातमी समोर येत आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीसोबत काँग्रेस युती करू शकते. यासंबंधित काँग्रेस नेते राहुल गांधी मोठे वक्तव्य केले आहे. नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? जाणून घेऊया…
हरियाणासाठी CEC बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी या बैठकीत म्हणाले आहेत, “राज्यात आम आदमी पक्षासोबत एकत्र निवडणूक लढल्याने काँग्रेसला फायदा होईल आणि दोन्ही पक्ष वेगळे लढले तर नुकसान सहन करावे लागू शकते.” या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेते एकमत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणाच्या सर्व 90 विधानसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार. असे म्हणाले होते.
काँग्रेसमध्ये संघर्ष सुरूच…
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून हरियाणा काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. राज्यातील पक्षीय राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भूपेंद्र सिंग हुड्डा, कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. दरम्यान, हरियाणा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पक्षाच्या कोणत्याही खासदाराला मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते, असे विधानही काँग्रेसकडून आले आहे. राज्यात काँग्रेसकडून भूपेंद्र सिंग हुडा, दीपेंद्र हुडा, रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे.