Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळानंतर आता विनेश फोगट आणि राहुल गांधी यांच्या भेटीची बातमी समोर आली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोन्ही कुस्तीपटू आणि राहुल गांधी यांच्या भेटीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशास्थितीत आता विनेश फोगट काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणुकीत उतरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विनेश फोगट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता राहुल गांधी यांच्या सोबतचे फोट समोर आल्यानंतर याबाबतची शक्यता बळावली आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या अटकळानुसार दादरीमधून विनेश फोगट यांना तिकीट दिले जाऊ शकते. त्याचवेळी बजरंग पुनिया हे बदलीमधून तिकीट मागत आहेत, परंतु काँग्रेसने त्यांना या जागेऐवजी जाट बहुल जागेवरून उमेदवारी देण्याचा विचार केला आहे. मंगळवारीच हरियाणातील काँग्रेस नेते बाबरिया यांनी विनेशबद्दल सांगितले होते की, तिच्याबाबतची परिस्थिती लवकरच स्पष्ट केली जाईल.
राहुल गांधी यांच्या भेटीपूर्वीच राजकीय वर्तुळात चर्चा होती की, विनेश फोगट सक्रिय राजकारणात उतरल्यास त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. काँग्रेसनेही विनेशला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत. विनेशने निवृत्तीची घोषणा केली तेव्हा तिच्यासोबत काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुडा दिसले. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी विनेशला राज्यसभेवर पाठवण्याचीही मागणी केली होती, मात्र तिच्या वयामुळे हे शक्य झाले नाही. मात्र, विनेशचे काका महावीर फोगट आणि चुलत बहीण बबिता फोगट यांनी काँग्रेसच्या या उपक्रमावर टीका केली होती.
विनेशने राजकारणात प्रवेश केला तर काय होईल?
विनेश फोगटच्या संभाव्य राजकीय प्रवेशामुळे हरियाणाच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. खाप पंचायती आणि शेतकरी यांच्याशी असलेले त्यांचे मजबूत संबंध त्यांना निवडणुकीत मोठा पाठिंबा मिळवू शकतात. विनेशने अद्याप राजकारणात प्रवेश करण्याची औपचारिक घोषणा केली नसली तरी, राजकीय पक्ष तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न काही काळापासून करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांची भूमिका हरियाणाच्या राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारी ठरू शकते.
हरियाणात कधी होणार निवडणुका?
हरियाणा विधानसभेची निवडणूक ५ ऑक्टोबरला होणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. ही तारीख अनुक्रमे 1 आणि 4 ऑक्टोबर होती परंतु निवडणूक आयोगाने त्यात बदल केला आहे.