कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये (R G Kar Medical College and Hospital) प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील सरकारी रुग्णालयांच्या कनिष्ठ डॉक्टरांचा संप आजही सुरूच असल्याचे दिसून आले. या घटनेच्या विरोधात कनिष्ठ डॉक्टरांचे हे आंदोलन गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असून, त्यामुळे राज्यातील बहुतांश वैद्यकीय सुविधांतील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. गेल्या २६ दिवसांपासून हे आंदोलन अखंडपणे सुरूच आहे.
एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले की, “आमच्या बहिणीला न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील आणि जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.” आंदोलक डॉक्टरांनी कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे, जी अद्याप पूर्ण झालेली नाही.
9 ऑगस्ट रोजी तरुण डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांनी योग्य ती पावले उचलली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यापूर्वी पोलिसांनी निष्काळजीपणा केला असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बंगालमध्ये सातत्याने निदर्शने सुरू आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली दिसून आली होती. यानंतर देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले होते. . सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर अनेक रुग्णालयांच्या डॉक्टरांनी संप रद्द केला. मात्र, बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे.
या प्रकरणात अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून सत्य बाहेर यायला हवे, असे आमचे मत असल्याचे आणखी एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले आहे .
घटनेनंतर लगेचच मुख्य आरोपी संजय रॉयसह एकूण 10 जणांची आतापर्यंत पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे.यामध्ये आरजी करचे माजी प्राचार्य संदीप घोष, एएसआय अनूप दत्ता, चार सहकारी डॉक्टर, एक स्वयंसेवक आणि दोन रक्षकांचा समावेश आहे.
संजय रॉय हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून सीबीआयने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनाआर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.काल सीबीआयने घोष यांना अलीपूर न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता घोष यांना पाहताच आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत त्यांना फाशीची मागणी केली. मात्र, नंतर पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले.