Yogi Adityanath : उत्तर प्रदेशच्या राजकारणात बुलडोजर मुद्दा चांगलाच रंगला आहे. आता बुलडोजर कारवाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, त्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादवांमध्ये वार-पलटवार सुरू झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी बुलडोजरबाबत सीएम योगींना टोला लगावला होता, त्यानंतर सीएम योगींनी आता अखिलेश यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी योगी म्हणाले आहेत, “बुलडोजर चालवण्यासाठी दम लागतो. त्यासाठी डोकं असायला हवे. बुलडोजर सगळ्यांच्याच हातात बसत नाही.” पुढे त्यांनी ‘टिपू’ला देखील सुलतान बनायचे आहे अशी टिप्पणी देखील केली.
अखिलेश यादव यांनी मंगळवारी म्हंटले होते, “2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया होईल. भाजप सरकारमध्ये निरपराध लोकांवर अत्याचार होत आहेत. शेतकरी चिंतेत आहेत. तरुणांचे भविष्य अंधारात आहे. समाजातील प्रत्येक घटक त्रस्त आणि वाईट स्थितीत आहे. २०२७ नंतर गोरखपूरच्या दिशेने बुलडोजरची तोंडे असतील. सरकार बनवल्यानंतर बुलडोजरची दिशा बदलेल.” या विधानावर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
योगी आदित्यनाथ यांचे सरकार यूपीत आल्यापासून उत्तर प्रदेशात गुन्हेगार आणि माफियांविरोधात बुलडोजर कारवाई केली जात आहे. म्हणून योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात बुलडोजर बाबा असेही म्हंटले जाते.