Droupadi Murmu : देशभरात आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ५ सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे आणि यामुळेच 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, आजच्या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 82 शिक्षकांचा सन्मान करणार आहेत.
या पुरस्कारासाठी 82 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे विज्ञान भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याआधी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा फक्त शाळेतील शिक्षकांना दिला जात होता परंतु आता यावर्षीपासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामध्ये उच्च शैक्षणिक संस्था आणि पॉलिटेक्निकमधील 16 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांचे जीवन देखील समृद्ध केले आहे अशा शिक्षकांना सन्मानित करणे हाच उद्देश राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यामागे आहे. असे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पुरस्कारासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांची निवड केली गेली आहे.
दरम्यान, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश , स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य क्षेत्र मंडळ यांची मान्यता असलेल्या शाळांचा यामध्ये समावेश असतो. या शाळांमधील शिक्षक आणि शाळा प्रमुख या पुरस्कारासाठी पात्र असतात. यामध्ये, केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालय संरक्षण मंत्रालयद्वारे चालवल्या जाणाऱ्या सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्थाद्वारे संचालित शाळा आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याशी संलग्न असलेल्या शाळांचा देखील समावेश असतो. तुमच्या माहितीसाठी या पुरस्कारासाठी ऑनलाइन परीक्षाद्वारे निवड केली जाते.