Ajit Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधीच सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून, राज्यातील बडे नेते महाराष्ट्र्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, महायुतीत जागावाटपावरून नाराजीनाट्य घडत आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. तसेच, शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडे अनेक इच्छुकांचा ओढा असल्याचं दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील चिंचवडमधील नेते, नाना काटे हे हातात तुतारी घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला आहे. तर, नाना काटे हे चिंचवडमधील अजित पवार यांचे समर्थक आहेत. 2023 मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली होती.
तेव्हा, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नाना काटे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाना काटे हे अजितदादांसोबत राहिले.
आता नाना काटे यांनी चिंचवडमधून निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण सध्या भाजपच्या अश्विनी जगताप येथून आमदार आहेत. अशातच जर, ही जागा भाजपकडे (BJP) गेल्यास पुढील निर्णय घेऊ, असं नाना काटे यांनी सांगितलं आहे.
नाना काटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी देखील ते ‘तुतारी’ हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काटे यांनी ‘तुतारी’ हाती घेतल्यास अजितदादांना मोठा धक्का बसू शकतो.
काय म्हणाले नाना काटे?
“विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हाच अजित पवार यांना मी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी अजितदादांनी मला तु तुझ्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेव, गाठीभेटी घे, अजून कुठलीही जागा निश्चित झालेली नाही,” असं सांगितलं आहे.
“मी येणारी विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्यामुळे निश्चितच माघार नाही. जर जागा आम्हाला सुटली नाहीतर मी उमेदवार म्हणून राहणार आहे. अजून मला दुसऱ्या पक्षाच तसं काही आलेले नाही. पण येणारी निवडणूक मी चिन्हावर लढणार आहे. दादांनी मला अजूनही ही जागा कोणत्या पक्षाला गेलेले नाही असं सांगितलं आहे. ही जागा आमच्या पक्षाला गेली नाही तरीही मी निवडणूक लढणार आहे, असंही नाना काटे म्हणाले.