देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अनेक नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असून महायुतीत जागावाटपावरून नाराजीनाट्य घडत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त 12 जागांचे वाटप कसे होणार याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू होती परंतु आता राज्यपाल नियुक्त 12 जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारपासून राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त आहेत. शिवसेनेचे माजी आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय चंद्रकांत रघुवंशी यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याविषयी माहिती दिलेली आहे. भाजपाला 6 शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्मुला ठरला आहे.
याआधी राज्यपाल नियुक्त 12 जागा वाटपाचा फॉर्म्युला 4- 4- 4 असा ठरला होता. परंतु आता कोर्टाकडून सांगण्यात आले आहे की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकणार नाही कारण तो महाराष्ट्र शासनाचा विषय असून यावर सरकारचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत आता लवकरच राज्यपाल नियुक्त 12 जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लागेल असे वक्तव्य चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला न्याय देतील कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. असे देखील रघुवंशी यांनी म्हंटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. यापूर्वीच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये संधी देण्यात येईल असे उद्धव ठाकरेंनी मला वचन दिले होते परंतु यानंतर मी एकनाथ शिंदे गटात सामील झालो. यामुळेच माझा विचार मुख्यमंत्र्यांनी या जागांसाठी करावा आणि मला संधी द्यावी असे वक्तव्य देखीलचंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.