Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने आपली नवी इनिंग सुरू केली आहे. क्रिकेटपटूने भाजपचे सदस्यत्व घेत राजकारणात प्रवेश केला आहे. याचा एक फोटो रवींद्र जडेजाची पत्नी आमदार रिवाबा जडेजा यांनी सोशल मीडियावर सदस्यत्व क्रमांकासह शेअर केला आहे.
विशेष म्हणजे याआधी रीवाबा जडेजा यांच्या सोबत रवींद्र जडेजाने भाजपसाठी अनेकदा काम केले आहे. शिवाय त्याने आपल्या पत्नीसाठी एक रोड शो देखील केला होता. आता त्याने स्वत: भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
जद्दू निवडणूक लढवणार का?
T-20 वर्ल्ड इंटरनॅशनलमधून नुकताच निवृत्त झालेला रवींद्र जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. 2023 मध्ये शेवटचा वनडे खेळणारा जडेजा क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केल्यानंतर सक्रिय राजकारणात दिसू शकतो. दरम्यान, या महिन्यात सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजा खेळताना दिसू शकतो. भारताने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली पाठोपाठ जडेजाने देखील आपली निवृत्ती जाहीर केली होती.
पंतप्रधान मोदींची सदस्यत्व मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्यत्वाच्या नूतनीकरणासह, 2024 या वर्षासाठी केंद्रातील सत्ताधारी पक्षाची सदस्यत्व मोहीम 2 सप्टेंबरपासून सुरू झाली. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सर्व केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात झाली.
पंतप्रधानांनंतर शहा, नड्डा आणि राजनाथ सिंह यांनीही पक्षाने जारी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन भाजपच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण केले.