पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडू अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडू यश मिळवत आहेत. आतापर्यंत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला 22 पदके मिळालेली आहेत. अशातच हरविंदर सिंगने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.
तिरंदाजीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा हरविंदर सिंग हा पहिलाच खेळाडू आहे. 4 सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत त्याने पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 ने पराभव केला. तर प्री-क्वार्टर फायनलमध्ये इंडोनेशियाच्या सेतियावानचा 7-3 ने पराभव केला तसेच चायनीज तैपेईच्या Tseng Lung-hui चा 6-2 ने पराभव केला. उपांत्य फेरीत हरविंदरने इराणी प्रतिस्पर्धी मोहम्मद रेझा अरब अमेरी याचा ७-३ ने पराभव केला आणि नंतर हरविंदर सिंग फायनलसाठी पात्र ठरला आणि अंतिम फेरीत त्याने सुवर्णपदक पटकावले.
दरम्यान, 2017 पॅरा तिरंदाजी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये हरविंदर सिंगने सातवा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 2018 च्या जकार्ता आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते तसेच हरविंदरने तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता.
त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हरविंदर सिंगचे अभिनंदन. त्याची अचूकता, फोकस हे उत्कृष्ट आहेत. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे भारतीय जनता अतिशय खुश आणि आनंदी आहे.”