Kolkata Doctor Rape-Murder Updates : पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा वाद थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. याप्रकरणात आता सीबीआयनंतर ईडीने प्रवेश केला आहे.
ईडीने आज म्हणजेच शुक्रवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात, ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतरांच्या घरांवर छापे टाकले आहेत. कोलकात्यात 5 ते 6 ठिकाणी ईडीचे छापे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीबीआयने आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष आणि इतर तिघांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली होती. घोष यांचे सुरक्षा रक्षक अफसर अली (४४) आणि हॉस्पिटलचे सेल्समन बिप्लव सिंघा (५२) आणि सुमन हजारा (४६) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे लोक हॉस्पिटलला साहित्य पुरवायचे.
संदीप घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात, संस्थेतील अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक डॉ. अख्तर अली यांनी केली होती. त्यात त्यांनी संदीप घोष यांच्यावर रुग्णालयातील बेवारस मृतदेहांची तस्करी, जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीत भ्रष्टाचार आणि बांधकाम निविदांमध्ये घराणेशाहीचे आरोप केले होते. कोलकाता पोलिस यापूर्वी या प्रकरणाचा तपास करत होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनेही हा तपास हाती घेतला. आणि आता या प्रकरणात ईडीचा देखील समावेश झाला आहे.
कोलकाता पोलिसांनी 19 ऑगस्ट रोजी संदीप घोष यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घेतला. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी पुन्हा तपासणी केली आणि वर दिलेल्या कलमांखालीच संदीप घोषला अटक करण्यात आली.