पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने(Pakistan Supreme Court )शाहबाज सरकारला मोठा दिलासा दिला असून,आज आपल्या एका निर्णयात न्यायालयाने देशातील भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील बदल पुन्हा लागू केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांचे मोठे बंधू नवाझ शरीफ यांच्यासह अनेक राजकारण्यांना याचा फायदा होईल अशी शक्यता दिसत आहे.
डॉन वृत्तपत्रानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने फेडरल सरकार आणि इतर पक्षांच्या आंतर-न्यायालयीन अपीलांवर सुनावणी केल्यानंतर ६ जून रोजी निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी आज हा निकाल दिला आहे . देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की त्यांनी फेडरल सरकार आणि इतर प्रभावित पक्षांनी दाखल केलेले आंतर-कोर्ट अपील स्वीकारले,
वास्तविक, शहबाज शरीफ यांच्या सरकारने मे २०२३ मध्ये एनएबी कायद्यात सुधारणा केली होती. ज्यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष तेहरीक-ए-इन्साफने जोरदार टीका केली होती. मात्र आता पुन्हा एकदा स्वीकारण्यात आलेल्या या दुरुस्तीमुळे सत्ताधारी पक्षाशी संबंधित अनेक नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे खटले मागे घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जात आहे.
तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने या कायद्यावर टीका केली होती कारण यामुळे आसिफ अली झरदारी, शेहबाज शरीफ आणि त्यांचे भाऊ नवाझ शरीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे खटले मागे घेण्यात आले होते. माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांनी या सुधारणांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे बदल रद्द केले होते. त्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने ६ जून रोजी निकाल राखून ठेवला होता.
सर्वोच्च न्यायालयाने आज अपीलच्या बाजूने एकमताने निर्णय दिला आणि पूर्वी असंवैधानिक घोषित केलेल्या दुरुस्त्या पुनर्स्थापित केल्या. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश “संसदेचे द्वारपाल होऊ शकत नाहीत.” तसेच सुप्रीम कोर्टाने सांगितले की, “जेव्हा शक्य असेल तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने संसदेने केलेला कायदा कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा.” इम्रान खान रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून व्हिडिओ लिंकद्वारे कोर्टात हजर झाले. खान गेल्या वर्षी सप्टेंबरपासून या कारागृहात बंद आहेत.