मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवस पुकारलेला संप आता मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत त्यांच्या समस्यांवर यशस्वी तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर त्यांच्या मूळ पगारात ६५०० रुपयांची घसघशीत वाढही करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा संप पुकारण्यात आल्यानं गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर सह्यादी गेस्ट हाऊस इथं मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध १३ संघटनांच्या समन्वय कमिटीसोबत बैठक पार पडली. यावेळी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.
आता १ एप्रिल २०२० पासून सरसकट एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ६५०० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावरही लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे! ६५०० रुपयांची वेतनवाढ एप्रिल २०२० पासून लागू!#GopichandPadalkar #BJP #Maharashtra pic.twitter.com/Huq775C5cH
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 5, 2024
दरम्यान, “आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची होती. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अडीच हजार, 4 हजार आणि 5 हजार अशी सरसकट वाढ मिळाली होती, त्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनात वाढ केली असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.