भारत नेहमीच शांततेचा उपासक राहिला आहे आणि राहील, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे सैन्याच्या कमांडर्सना आपण बजावल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh ) यांनी सांगितले आहे .
यासंदर्भात पुढे राजनाथ म्हणाले की, भारताने कायम जगात ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देत शांततेचा पुरस्कार केला आहे. आम्ही शांतीचे उपासक होतो आणि भविष्यातही राहूच. परंतु, वर्तमानातील जागतिक परिस्थितीचा विचार करून मी लष्कराच्या कमांडर्सना सांगितले होते की, जगात आणि भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सदैव युद्धासाठी तयार असले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपली शांतता भंग पावू नये.यासाठी प्रयत्न करणे भाग आहे.
काही दिवसापूर्वी लखनऊ येथे लष्कर कमांडर्सची परिषद झाली, यावेळी राजनाथ सिंह यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सद्यस्थितीचा उल्लेख केला होता. त्यांनी कमांडरना या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी, भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्यांचा अंदाज घ्या आणि सामोरे जाण्यासाठी तयार रहा. असे सांगितले होते. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि शेजारील देशांमधील घडामोडी लक्षात घेऊन सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
जागतिक परिस्थितीशी तुलना करता भारत शांततेने विकसित होत आहे. परंतु, वाढती आव्हाने पाहता आपण सतर्क राहण्याची गरज आहे. अमृतकाळात आपण आपली शांतता राखणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, वर्तमानात आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा असायला हवीच मात्र त्याच बरोबर अतुलनीय प्रतिकार क्षमतेची गरज असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
यासोबतच संरक्षण मंत्र्यांनी डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही लष्करी नेतृत्वाला केले. हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाचा मार्ग ठरवत असतो असे त्यांनी सांगितले.