भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे . नवी दिल्ली येथील कॉंग्रेस मुख्यालयात यावेळी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर विनेशने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती आणि त्यानंतर आज तिने व बजरंग यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .
राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन सुवर्णपदकं, आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व कांस्यपदक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन कांस्य अशी अनेक पदकं जिंकणाऱ्या विनेशने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले होते. तिच्यासोबत बजरंग व साक्षी मलिक हे ऑलिम्पियनही होते. पॅरिसमध्ये विनेशवर अपात्रतेची कारवाई केली गेली, कारण तिचे वजन १०० ग्रॅम जास्त आढळले. यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान विनेशने भारतीय रेल्वेतील नोकरीचाही राजीनामा दिला आहे.
साक्षी मलिकची नाराजी
काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या विनेशच्या निर्णयावर कुस्तीपटू साक्षी मलिक मात्र नाराज दिसली. ती म्हणाली की, मलाही राजकीय पक्षांकडून ऑफर होत्या, परंतु मी त्या अमान्य केल्या. विनेशचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याचा आमच्या आंदोलनावर परिणाम होता कामा नये, एवढीच इच्छा आहे. महिला कुस्तीपटूंसाठी मी लढण्याच्या माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे. .
विधानसभेसाठी तीन जागांचा पर्याय
काँग्रेस पक्षाने विनेश फोगाटला हरियाणातील तीनपैकी कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. या तीन जागांमध्ये चरखी-दादरी, बधरा आणि जुलाना या जागांचा समावेश आहे. चरखी दादरी हा विनेश फोगाटचा जिल्हा आहे आणि जाटबहुल क्षेत्र आहे. बधरा हे विनेश फोगाटच्या बलाली गाव त्या अंतर्गत येते. या गावातून विनेशने कुस्तीच्या आखाड्यात प्रवेश केला आणि आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे.