बाप्पाच्या आगमनाने आता महाराष्ट्रात आनंददायी वातावरण पसरलेले आहे. सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेशमूर्तीची घरात तसेच मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणपती मंदिरांचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
यावर्षी देखील अनेक मंडळांनी गणेशोत्सवाचे आकर्षक असे देखावे सादर केले आहेत. परंतु पुण्यातील एका गणेश मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. पुण्यातील या मंडळाने अमृतसर येथील ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा उभारला. मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून या मंदिराच्या देखाव्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर आता या देखाव्याचे नाव बदलून यात थोडे फार बदल करण्यात आले आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळात ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा उभारण्यात आला. मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने यावर आक्षेप घेत अमृतसरचे सुवर्ण मंदिर म्हणजेच ‘गोल्डन टेम्पल’ हे शिखांचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे गणेश मंडळ त्याचा देखावा सादर करु शकत नाही. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. असे त्यांचे म्हणणे होते.
याच पार्श्ववभूमीवर मंडळाने काल या कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली त्यानंतर कमिटीच्या दोन प्रतिनिधिनी मंडळाला भेट दिली आणि काही बदल सुचवले मंडळाने त्याची तयारी दाखवली. या कमिटीने पंजाबमधीलच या सुवर्णं मंदिराशी साम्य असलेल दुर्ग्याण मंदिर तयार करण्यास सांगितले. दरम्यान, आता या देखाव्याला दुर्ग्याण मंदिर असे नाव देण्यात आले आहे. यानुसार मंडळाने यामध्ये बदल केले आहेत.