Lucknow Building Collapse Update : लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाचे पथक अजूनही बचाव कार्यात गुंतले आहेत. तेथील पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेली तीन मजली इमारत फक्त चार वर्षांपूर्वी बांधली गेली होती.
अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांनी ढिगाऱ्यातून आणखी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत, त्यानंतर या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे.
मुसळधार पावसानंतर झाला अपघात
कोसळलेली ही इमारत सुमारे चार वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसानंतर दुपारी 4.45 च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तेथे लगेच मदत कार्य पोहचले, आणि जखमींना जिल्ह्यातील लोकबंधू रुग्णालयासह दाखल करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या एका खांबाला तडा गेला असून पावसामुळे ही इमारत कोसळली, या घटनेत अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. तसेच मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे.
गेल्या शनिवारी सरोजिनी नगर परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले होते, त्यापैकी २८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.