Giorgia Meloni : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची स्थिती आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर जगाच्या नजरा सर्वात मोठ्या लोकशाहीवर खिळल्या आहेत. अशातच 30 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत उत्सुक आहे. हा संघर्ष संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास अमेरिकेसह जगातील प्रमुख देशांना आहे. या संदर्भात इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचेही वक्तव्य आले आहे.
युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीनसारखे देश भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी शनिवारी म्हंटले आहे. त्यांनी शनिवारी उत्तर इटालियन शहर सेर्नोबिओ येथील ॲम्ब्रोसेटी फोरममध्ये याबद्दल टिप्पणी केली, जिथे त्यांनी युक्रेनियन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी देखील बैठक घेतली.
मेलोनी यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेन संघर्षासंदर्भात ज्या तीन देशांशी संपर्क साधला आहे त्यात भारताचा समावेश केला आहे आणि ते म्हणाले की, भारत या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
झेलेन्स्की यांच्यासोबतच्या बैठकीत मेलोनीम्हणल्या, “आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम मोडले तर अराजकता आणि संकट निर्माण होईल हे स्पष्ट आहे. चीनच्या पंतप्रधानांनाही मी हेच सांगितले. “मला वाटते की युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी चीन आणि भारतासारखी राष्ट्रे भूमिका बजावू शकतात.” दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही या समस्येचे निराकरण करण्यात भारताच्या भूमिकेचा उल्लेख केला.
पुतिन म्हणाले होते, “आम्ही आमच्या मित्रांचा आणि भागीदारांचा आदर करतो, ज्यांना मला वाटते की (युक्रेनशी) संघर्षाशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यात प्रामाणिकपणे रस आहे. मी चीन, ब्राझील, भारताच्या नेत्यांच्या संपर्कात आहे आणि या देशांच्या नेत्यांवर माझा विश्वास आहे. ते समस्या सोडवण्यात भूमिका बजावू शकतात. ”
एका वेगळ्या विधानात, रशियन राष्ट्रपतींचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी “पुतिन, झेलेन्स्की आणि यूएस यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत असल्याने भारत युक्रेनशी चर्चा सुलभ करण्यासाठी भूमिका बजावू शकतो.” उल्लेखनीय आहे की पीएम मोदी यांनी जुलैमध्ये रशिया आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये युक्रेनला भेट दिली होती, जिथे त्यांनी पुतीन यांना युद्ध संपवण्याचे आवाहन केले होते.
जुलैमध्ये मॉस्को दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी उपाय शोधण्यासाठी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी विस्तृत चर्चा केली होती. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि चांगल्या संबंधांचा उल्लेख करत पुतिन यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेले संकट संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराचेही कौतुक केले होते.