Patna BJP Leader Murder : बिहारची राजधानी पाटणा येथून मोठी बातमी समोर येत आहे. पहाटे भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाटणा शहरातील शिकारपूर चौकात रामदेव कम्युनिटी हॉलजवळ ही घटना घडली. श्याम सुंदर उर्फ मुन्ना शर्मा असे या भाजप नेत्याचे नाव आहे.
श्याम सुंदर मनोज पाटणा येथील कमलिया गेटजवळ थांबले होते, तेव्हा अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. पहाटे झालेल्या गोळीबाराने संपूर्ण राजधानी हादरली. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
गोळी लागल्यानंतर त्यांना नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या याचा शोध घेत आहेत.
या घटनेबाबत जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ते खूप व्यवहारिक व्यक्ती होते, ते भाजपचे पाटणा सिटी चौकाचे माजी नगराध्यक्ष होते. आम्ही रोज मंगल तालाबला येथे मॉर्निंगसाठी येतो. मात्र, सकाळी आल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे कळले. आम्ही परिसरात असेलल्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ पाहिला आहे. ते सकाळी मंदिरात गेल्यावर बाहेर आले आणि कोणाशी तरी बोलत होते, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन मुलांनी त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून, मोबाईल हिसकावला आणि डोक्यात गोळी झाडून पळ काढला. याबाबत संशोधन सुरु असून या घटनेबाबत पुढील कारवाई लवकरच केली जाईल.
दरम्यान, ही घटना लूटमारीच्या उद्देशाने झाली की काही कट आहे, हा तपासाचा विषय आहे. पुढील तपासानंतरच या घटनेमागचे कारण स्पष्ट होईल.