राज्यात विधानसभा निवडणूकातोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. याच विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सुचना दिलेल्या आहेत. उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यांमसोर ठेवा असे महायुतीतील इतर नेत्यांना त्यांनी सांगितले आहे.
महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा, तसेच महायुती कशी एकजूट दिसेल, याची काळजी घ्या. राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना अमित शाह यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत जागावाटपवर निर्णय झाला असून भाजप 160 जागांवर निवडणूक लढवणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला 64 जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीकडून कोणत्या भागात किती सभा घ्यायच्या आणि कोणत्या वेळेत घ्यायच्या याबाबत या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान सोमवारी अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन घेणार आहेत.