NSA Ajit Doval : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी सध्या साऱ्या जगाच्या नजरा फक्त भारतावर आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम रशियाला भेट दिली होती आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. रशिया नंतर मोदींनी अलीकडेच युक्रेनला भेट दिली. अशा पारिस्थितीत भारत या दोन देशांमधील युद्ध थांबेल असा विश्वास जवळ-जवळ सर्वच देशांनी व्यक्त केला.
अलीकडेच, 27 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यादरम्यान चर्चा झाली की, युक्रेन भेटीनंतर भारत शांतता कराराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपले NSA अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर पाठवेल.
यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी शांततेच्या प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका आणखी मजबूत होईल. सध्या शांतता कशी राखता येईल यावर चर्चा करण्यासाठी NSA अजित डोवाल रशियाला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यानंतर आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा प्रश्न फक्त भारतच सोडवू शकतो. असा विश्वास दाखवला. मात्र, NSA अजित डोवाल रशियाला कधी जाणार हे स्पष्ट झाले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांत युक्रेन आणि भारताचा दीर्घकालीन मित्र रशिया या दोन्ही देशांना भेट दिली आहे. संपूर्ण जगाच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहेत. जुलैमध्ये रशियाच्या भेटीदरम्यान, पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संदेशाचा पुनरुच्चार केला की ‘हे युद्धाचे युग नाही.’ तर ऑगस्टमध्ये त्यांनी युक्रेनला भेट दिली आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी शांततेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच म्हटले आहे की, ते शांततेच्या विरोधात नाहीत. युक्रेनसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी ब्राझील, चीन आणि भारत हे संभाव्य मध्यस्थ म्हणून त्यांच्याकडे पाहतो. इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही या मताचा पुनरुच्चार केला. संभाव्य मध्यस्थ म्हणूनही त्यांनी भारताला पाठिंबा दिला. जो जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाचा पुरावा आहे. रशिया आणि युक्रेनच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले आणि युक्रेनमधील शांतता प्रयत्नांवर चर्चा केली.