Mahayuti Meeting : राज्यात काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून सध्या महाराष्ट्र्र दौरा सुरु आहे, अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. काल रात्री त्यांच्या उपस्थित महायुतीची एक बैठक पार पडली.
दरम्यान, मुंबई दौऱ्याचा समारोप होण्यापूर्वी देखील अमित शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या देखील उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द अमित शहांनी दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अमित शाह यांनी महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री दिली. महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागा वाटपाबाबत अमित शाह यांनी शब्द दिला आहे. याशिवाय ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या सूचना देखील अमित शाह यांनी यावेळी दिल्या आहेत.
महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अमित शाह यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची पुढील बैठक दिल्लीत पार पडणार आहे.
दरम्यान, रविवारी रात्री मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली . या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा झाली. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा सूचना देखील शहांनी यावेळी दिल्या.