आम आदमी पक्षाने सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामुळे आता काँग्रेससोबत आघाडीची चर्चा थांबण्याचे चिन्ह दिसत आहेत. 90 सदस्यीय विधानसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर असून, पक्षाने आपल्या पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
राज्यात संभाव्य आघाडीसाठी पक्षाची काँग्रेससोबत चर्चा सुरू होती. मात्र, ‘आप’ किती जागा लढवणार यावर चर्चा अडकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टी दोन अंकी म्हणजेच दहा किंवा दहा पेक्षा जास्त जागा मागत होती आणि काँग्रेस तीन पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नव्हती.
अशातच आदल्या दिवशी, हरियाणा प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता म्हणाले होते, जर सायंकाळपर्यंत काही तोडगा निघाला नाहीतर त्यांचा पक्ष सर्व 90 विधानसभा जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर करेल.
आज ते म्हणाले, “आम्ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून लवकरच तुम्हाला दुसरी यादी मिळेल. निवडणुकीला फारच कमी अवधी शिल्लक आहे. आम्ही प्रामाणिकपणे (युतीची) वाट पाहिली, आम्ही आमचा संयम दाखवला आणि त्यानंतर आम्ही आमची यादी जाहीर केली. असल्याचे त्यांनी म्हंटले
विशेष म्हणजे ज्या ११ जागांवर काँग्रेसने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती, त्या जागांवरही आम आदमी पार्टीने उमेदवार घोषित केले आहेत. अशा स्थितीत आता दोन्ही पक्ष सोबत निवडणूका लढवणार असल्याच्या चर्चांना जवळ-जवळ पूर्णविराम लागला आहे.
हरियाणा विधानसभेची निवडणूक ५ ऑक्टोबरला होणार असून ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर आहे.