Mahavir Phogat on Vinesh Phogat Joining Congress : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने आता कुस्तीकडे पाठ फिरवून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, विनेशच्या या निर्णयावर ताऊ महावीर फोगाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जेव्हा विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले त्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा महावीर फोगाट यांनी सांगितले होते की, विनेशने हा निर्णय मागे घेऊन खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा विचार केला पाहिजे. मात्र, विनेशने त्यांचे न ऐकता कुस्ती सोडून राजकारणाशी मैत्री केली.
विनेश फोगाटचे काका महावीर फोगाट तिच्या या पावलावर खूश नसून एका प्रसिद्ध वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “मी विनेशला कुस्तीमध्ये तिची कारकीर्द सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने माझे ऐकले नाही आणि राजकारणात येण्यापूर्वी माझा सल्लाही घेतला नाही.”
विनेश फोगाटला कुस्तीच्या युक्त्या शिकवणारे गुरु महावीर फोगट म्हणाले, “मी तिला कुस्ती सुरू ठेवण्यासाठी आणि चार वर्षांनंतर ऑलिम्पिकचे ध्येय ठेवण्याचा आग्रह केला. राजकारणात येण्याचा निर्णय तिचा स्वतःचा आहे. तिच्यात अजून बरीच कुस्ती शिल्लक आहे आणि तिने त्या खेळात टिकून राहावे. कारकिर्दीच्या या टप्प्यावर तिने राजकारणात येणे मला आवडले नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी विनेशने माझा सल्ला घेतला नाही.
आपला मुद्दा पुढे करत महावीर फोगाट यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांची मुलगी आणि माजी महिला कुस्तीपटू बबिता फोगाट देखील राजकारणात आहे पण ती भाजपशी संबंधित आहे. विनेशवर प्रतिक्रिया देताना महावीर फोगाट म्हणाले की, विनेशला राजकारणात रस असेल तर तिने काँग्रेसऐवजी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता.
महावीर फोगाटयांची धाकटी मुलगी बबिता फोगाट ही भाजपची सदस्य आहे आणि तिने दादरी विधानसभा मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती, पण तिथे तिचा पराभव झाला होता. आता चुलत बहीण विनेश फोगाट देखील राजकारणात नशीब अजमावत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसने विनेश यांना उमेदवारी दिली आहे.