Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकराची लाडकी बहीण योजना सर्वत्र चर्चेत आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरु केलेल्या या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाला असून, आता या महिन्यात दुसरा हप्ता दिला जाणार आहे. दरम्यान आता ‘लाडकी बहीण योजने’सह (Ladki Bahini Yojana) राज्य सरकारच्या दहा महत्त्वपूर्ण योजनांची माहिती दारोदारी पोहोचवली जाणार आहे. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट’ मोहिमेची घोषणा सोमवारी केली.
या योजनेअंतर्गत आता शिवसेनेचे राज्यभरातील पदाधिकारी रोज 15 कुटुंबांना भेटून मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचा आढावा घेतील. ज्या कुटुंबाना याचा लाभ मिळाला नाही, त्या कुटुंबाला ती योजना कशी मिळेल यासंदर्भात मदत करतील. या खास योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: 15 कुटुंबांना भेट देऊन माहिती घेणार आहेत.
सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब आणि लाभ न मिळालेल्या कुटुंबांचीही भेट घेतली जाईल. या योजनेचा ज्यांना अजूनही लाभ मिळाला नाही त्यांना या योजनेत सामावून घेण्यात येईल’ असे स्पष्ट केले आहे. तुमच्या माहितीसाठी या मोहिमेंतर्गत विशेष ॲपही सुरू करण्यात आला आहे.
‘या’ दहा योजनांचा प्रचार
या मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजनांबाबत कुटुंबांकडे विचारपूस केली जाणार आहे. या योजनांअंतर्गत कुटुंबातील एखादा व्यक्ती वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन त्याला या मोहिमेत सामील केले जाणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
तुमच्या माहितीसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीला ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांनी अजूनही या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला नाही त्यांना आता फॉर्म भरता येणार आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना त्याच महिन्यातील पैसे मिळतील, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत.