Ganeshotsav 2024 : लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav 2024) आगमन होऊन आता चार दिवस उलटले आहेत. बाप्पाचे दर्शन करण्यासाठी लोकं आता घराबाहेर पडत आहेत. याच अनुषंगाने पुण्यातील (Pune) पेठ भागांमध्ये आता वाहतुकीचे नवीन नियम लागू केले गेले आहेत, खरं तर पुण्यातील पेठ भागांमध्ये गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, याच गर्दीचा विचार करता बुधवारपासून (11 सप्टेंबर पर्यंत) शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत.
यामध्ये लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता हे पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. अशा स्थितीत आता वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर शहरातील लोक गणपती पाहायला घराबाहेर पडतील. अशापरिस्थितीत गुरुवारपासून (11 सप्टेंबर) शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत हा बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. अशास्थितीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
वाहतुकीस बंद असणारे रस्ते
लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता. (मराठा चेंबर ऑफ काॅमर्स ते हिराबाग चौक)
वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते
सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ)
दरम्यान, शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.