Kirit Somaiya : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचे काम देण्यात आले आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
समितीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केली आहे. प्रत्येक नेत्याला जबाबदारी देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे पक्षाच्या कामामध्ये सक्रीय दिसत नव्हते. पण, आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला पुरतं घायाळ केलं होतं. विविध घोटाळे काढून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या भाजपमध्ये (BJP) असून बाजूला होते. विरोधकांनी त्यांना चांगलेच घेरले होते. त्यानंतर पक्षाकडून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र, यावेळी विधानसभा निवडणूक वेगळ्या पातळीवर लढली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला चांगलाच फटका बसला होता. म्हणून यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी वेगळी रणनीती आखली जात आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांना देखील अॅक्टीव्ह केलं आहे.