नाशिक : शिंदेगाव येथे आज दुपारी फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येथील आग इतकी भीषण होती की, गोडाऊन मधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर येत होते. यानंतर पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
माहितीनुसार, चंद्रकांत शिवलाल विसपुते व गौरव चंद्रकांत विसपुते राहणार देवळाली गाव यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाने गोडाऊन आहे. या गोडाऊनला ही आग लागली आहे आहे. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज झाला. त्यानंतर परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनतर गोदामात अडकलेल्या कामगारांना बाहेर करण्यात आले. आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले.
दिवाळीचा सण तोंडावर असताना या गोदामात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा जमा केला जात होता. गोदामात फटकांचा माल उतरविण्यासाठी ट्रक आलेला असताना आग लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर याबाबत पुढील तपास केला जाईल, आणि हा अपघात कशामुळे झाला याचा शोध घेतला जाईल.