सिंधुदुर्गमधील (Sindhudurg ) मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte ) याला अटक करण्यात आली होती. त्याचसोबत त्याचा सल्लागार चेतन पाटील ( Chetan Patil ) याला देखील पोलिस कोठडीत ठेवले होते. परंतु त्या दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याची मुदत संपली होती यामुळेच आज याबाबत निर्णय देण्यासाठी चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना मालवण दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर न्यायालयाकडून चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू झाली होती . या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यामुळे आंदोलन देखील करण्यात आले होते. अवघ्या 8 महिन्यांच्या बांधकामानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व शिवभक्तांकडून केली जात होती . पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अनेक दिवस फरार झाला होता. तब्बल 11 दिवस तो फरार होता. यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यास यश मिळालेआहे .
सरकारी वकील ॲड तुषार भणगे यांनी न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती दिलेली आहे. जयदीप आपटे हा पोलिसांना व्यवस्थित माहिती देत नाही त्यामुळे सात दिवसाची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती परंतु आता न्यायालयाने जयदीप आपटेला 13 सप्टेंबर पर्यंतची म्हणजेच 3 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच पुतळा तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले होते अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलेली आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी जयदीप आपटे यांची पत्नी आणि आई उपस्थित होती. तर, चेतन पाटील यांचे बंधू देखील न्यायालयात सुनावणीवेळी उपस्थित होते.