सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीची सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अस असतानाच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. सध्या महायुतीत फुट पडणार का अशा चर्चा रंगत आहेत. कारण बारामतीत अजित पवारांच्या फोटोवर शिवसेनेकडून काळ कापड टाकण्यात आला आहे. तसेच अजित पवारांचा निषेध देखील केला जात आहे. शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकनाथ फेस्टिवलला आमंत्रित केले होते परंतु या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत यावरूनच शिवसेनेने हे कृत्य केले आहे
सुरेंद्र जेवरे यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. याआधी अजित पवार यांच्यावर लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावरून महायुतीतील नेत्यांनीच टीका केली होती. आता अजित पवार यांच्या फोटोवर शिवसेनेकडून काळ कापड टाकण्यात आला आहे. यावरून आता आमदार अमोल मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हवसे, गवसे, नवसे कार्यकर्ते हे प्रत्येक पक्षात असतात. त्यापैकीच हा नवसा कार्यकर्ता असेल अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे.
प्रकाश झोतात राहायचे होते, म्हणून दादांनी आम्हाला वेळ दिला नाही हे कारण पुढे करत काळा पडदा टाकण्यात आला. असं अमोल मिटकरी यावेळी म्हणाले आहेत. या घटनेवरून आता राजकारण चांगलंच पेटले आहे, महायुतीत फुट पडेल का ? अशा चर्चा सगळीकडे रंगत आहेत. या घटनेवर पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, “काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्यासारखा हा प्रकार घडला आहे.”
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षात एकवाक्यता असेल तरच विजय होऊ शकतो परंतु आता आजच्या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झालाय, त्यामुळे वरिष्ठांनी अशा लोकांना सक्त तंबी दिली पाहिजे असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी यावेळी केले आहे.