Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचे काम देण्यात आले. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे सदस्य पद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक पत्र लिहिले होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हंटल आहे. “प्रिय बावनकुळेजी, मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडेपाच (5 1/2) वर्ष, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे”
यावरच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, कोणाला विचारून पक्षाचे नेतृत्व हे एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ही जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतील.”
किरीट सोमय्या यांनी “महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, त्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारण्यास मी नकार देत आहे. मी काम करत आहे करत राहणार. पण आपल्या या समितीचा मी सदस्य नाही.” असं देखील म्हंटले होतं.