Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी यावेळी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केले ज्यावरून सध्या देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेही चांगलेच भडकले आहेत.
अमित शाह यांनी बुधवारी ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधींवर जोरदार घणाघात केला आहे. देशविरोधी बोलणे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय असल्याची त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
अमित शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले, “जम्मू-काश्मीरमधील ‘जेकेएनसी’च्या देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणे किंवा परदेशात भारतविरोधी बोलणे असो, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या असल्याचा संतापही शाह यांनी व्यक्त केला आहे. भाषा, प्रदेश आणि धर्मांधर्मात भेदभावावर बोलणे हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते.”
देशविरोधी बातें करना और देश को तोड़ने वाली ताकतों के साथ खड़े होना राहुल गाँधी और कांग्रेस पार्टी की आदत सी बन गई है। चाहे जम्मू-कश्मीर में JKNC के देशविरोधी और आरक्षण विरोधी एजेंडे का समर्थन करना हो, या फिर विदेशी मंचों पर भारत विरोधी बातें करनी हो, राहुल गाँधी ने देश की सुरक्षा…
— Amit Shah (@AmitShah) September 11, 2024
पुढे त्यांनी लिहिले, “देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे. मनातील विचार आणि कल्पना नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात. पण जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकात्मतेशी कोणी खेळू शकत नाही, असे आव्हान देखील शहांनी आपल्या पोस्टमधून दिले.
आरक्षणाबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
सध्या काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेचा दौरा करत आहेत यादरम्यान त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठाला भेट दिले, तिथे विद्यार्थ्यांनी त्यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि विचारले होते की, हे किती दिवस सुरू राहणार? यावर राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. यासाठी भारत सध्या योग्य ठिकाण नाही.” त्यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.