Gandhi Maidan Bomb Blast : पाटणा (Patna) येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट (Gandhi Maidan Bomb Blast) करणाऱ्या चारही दोषींची फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) जन्मठेपेत बदलली आहे. बुधवारी (11 सप्टेंबर) न्यायालयाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
या प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा आता 30 वर्षांच्या तुरुंगवासात बदलण्यात आली आहे. तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोघांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण 27 ऑक्टोबर 2013 चे आहे, जेव्हा नरेंद्र मोदी पाटणा येथील गांधी मैदानावर हुंकार रॅलीत जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. यावेळी या सभेत बॉम्बब्लास्ट करण्यात आला.
खरे तर आरोपींनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला पाटणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ज्यावर आज सुनावणी झाली. या प्रकरणी पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. नंतर 31 ऑक्टोबर 2013 रोजी एनआयएने हे प्रकरण आपल्या हातात घेतले. या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला.
2013 मध्ये ही घटना घडली तेव्हा गांधी मैदानावर भाजपची हुंकार रॅली काढण्यात आली होती. त्याचवेळी पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर असलेल्या शौचालयाजवळ पहिला बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर गांधी मैदानाच्या आजूबाजूला सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर ८९ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे एनआयए तपासाची मागणी केली होती.
एनआयएने 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते
एनआयएने २०१४ मध्ये या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात 187 जणांची साक्ष कोर्टात घेण्यात आली होती, ज्यानंतर पटनाच्या कनिष्ठ न्यायालयाने इम्तियाज आलम, हैदर अली, नुमान अन्सारी आणि मोजिबुल्ला अन्सारी यांना दोषी ठरवले आणि या शिक्षेनंतर सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली फाशीच्या शिक्षेला पाटणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, त्यावर आता पाटणा उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.