मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करून बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोपांचे सत्र सुरू केले असतानाच आता मराठा आंदोलकांकडून देखील बार्शीत जरांगे यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे.
मराठा आरक्षण चळवळीतील नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले असून, त्यांनी जरांगे यांना ११ प्रश्न विचारले असून, त्यांचे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.बार्शी शहरात शिवसृष्टीजवळ सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनात अण्णासाहेब शिंदे यांच्यासोबत अन्य मराठा कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. त्यांनीही जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या हेतूविषयी शंका घेणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांतील काही प्रश्न असे पंतप्रधान महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून जरांगे यांनी लोकसभेवेळी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी जरांगेंच्या मदतीने लोकसभेला पाठिंबा मिळवत यश मिळवले.
मात्र, या पक्षांनी अद्याप मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर का केलेली नाही? लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आणण्यात मदत केली. या सर्व ३१ खासदारांनी समाजाची मते घेत विजय मिळवला; तरी त्यातील कोणीही अद्याप मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर का केलेली नाही?
अश्या प्रकारचे प्रश्न या वेळी आंदोलकांकडून जरांगे यांना विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे जरांगे यांनी अद्याप दिलेली नसल्याचे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले. ही उत्तरे देणे त्यांनी टाळल्यास त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमस्थळी याबाबत मराठा समाजाचे आंदोलक त्यांना विचारणा करणार असल्याचेही शिंदे यांनी या वेळी जाहीर केले आहे .