Mumbai News : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अमेरिका (United States) दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केले होते ज्यावरून आता देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील राहुल गांधींच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसचा देशविरोधी आणि आरक्षणविरोधी चेहरा समोर आला असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले. एकनाथ शिंदे म्हणाले, “परदेशात आपल्या देशाची बदनामी करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. आरक्षण रद्द करण्याची त्यांची भाषा म्हणजे, त्यांच्या पोटातलं खरं ओठांवर आले. यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आरक्षण विरोधी चेहरा असल्याचे समोर आले आहे. आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे”. संविधान विरोधी कोण आहेत, हे संपूर्ण देशाला समजलं. आगामी काळात जनताच काँग्रेसला धडा शिकवेल,” असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिला. काँग्रेसनं दोनदा बाबासाहेबांना पराभूत करून धोका दिला. बाबासाहेबांना जे धोका देऊ शकतात, ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. बाबासाहेब नेहमी सांगायचे की, काँग्रेस हे जळतं घर आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानानं दिलेलं आरक्षण कायम राखण्यासाठी केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकार जनतेच्या पाठिशी उभी आहे, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
सध्या काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेचा दौरा करत आहेत यादरम्यान त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठाला भेट दिले, तिथे विद्यार्थ्यांनी त्यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि विचारले होते की, हे किती दिवस सुरू राहणार? यावर राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. यासाठी भारत सध्या योग्य ठिकाण नाही.” त्यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.